उझबेकिस्तानात म्हणजे ‘तैमूरलंग’च्या देशात - भाग १ - पूर्वपीठिका

उझबेकिस्तानात म्हणजे ‘तैमूरलंग’च्या देशात

भाग १ - पूर्वपीठिका

एखाद्या मध्य आशियायी देशाला भेट द्यावी असं गेली काही वर्षं मनात होतं. आग्नेय आशियातील बऱ्याच देशांमध्ये भ्रमंती झाली होती; काही देशांमध्ये तर दोन-दोनदा. संयुक्त अरब अमिरातीतील सातही अमिरातींमध्ये फिरल्यामुळे पश्चिम आशियायी देशाची कल्पना आली होती. भारतात जन्म आणि भारतासह नेपाळमध्ये फिरणं झाल्यामुळे दक्षिण आशियायी देशांबद्दल माहिती होती. पण भारताच्या वरच्या बाजूच्या, १९९१ साली सोव्हिएत युनियनच्या विभाजनातून स्वतंत्र झालेल्या पाच मध्य आशियायी देशांपैकी एखाद्या देशातही कधी जाणं झालं नव्हतं. त्यांपैकी एकाची निवड करणं तसं सोपं नव्हतं. कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिझस्तान हे ते पाच मध्य आशियायी देश. ह्या पाचही देशांची आणि त्यांच्या राजधान्या असलेल्या शहरांची नावं जरी अधूनमधून कानावर पडत असली तरी हे देश आणि त्यांच्या राजधान्या अशा जोड्या लावायला सांगितल्यास नक्की ‘विकेट’ गेली असती. त्यातल्यात्यात नावाने माहीत असलेलं शहर म्हणजे ताश्कंद; ते सुद्धा भारत - पाकिस्तानच्या इ.स.१९६५च्या युद्धानंतर तत्कालीन सोव्हिएत रशियातील तहाचं ठिकाण म्हणून. ‘ताश्कंद आता कुठल्या देशाची राजधानी आहे?’, ह्या प्रश्नावर परत ‘विकेट’ ठरलेलीच होती. थोडक्यात आम्ही ह्या मध्य आशियायी देशांत जाण्यास जरी उत्सुक असलो तरी त्यांच्या बाबतीत तसे अनभिज्ञच होतो.

ह्या देशांपैकी कझाकस्तानसाठी भारतीयांना व्हिसा लागत नाही. इतर देशांत व्हिसा लागतो, हे समजल्यावर नाही म्हटलं तरी कझाकस्तानकडे मन कललं. कझाकस्तान हा आकाराने ह्या सर्व मध्य आशियायी देशांत सर्वात मोठा देश. त्यातील महत्त्वाच्या आणि पर्यटन कंपन्यांच्या सुचिंमध्ये समाविष्ट असणाऱ्या शहरांपैकी अल्माटी हे महत्त्वाचं शहर दक्षिणेला तर त्याची राजधानी असलेलं अस्ताना हे शहर उत्तरेला. त्या दोन शहरांमध्ये हवाईमार्गे अंतर पावणे दोन तासांचं. त्यातील अल्माटी निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध तर अस्ताना हे नव्याने उभारलेल्या, वास्तुशास्त्रीयदृष्ट्या वेगळ्या प्रकारच्या विविध इमारतींसाठी ओळखलं जाणारं, असं वाचनात आलेलं. त्यातील एक अल्माटी सोडल्यास, मध्य आशियातच जाऊन आलेलं कोणी आमच्या माहितीत नव्हतं. 

ह्या सर्वच देशांमध्ये हवामान खूपच विषम. उन्हाळ्यात तापमान पंचावन्न अंशांपर्यंत तर हिवाळ्यात वजा पंधरा अंश किंवा त्याहून खाली जाणारं. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातही बराच फरक. त्यामुळे निवड करण्यात हवामान हा एक घटकही लक्षात घेणं गरजेचं होतं. ह्या सर्वच देशांच्या राजधान्या किंवा महत्वाच्या शहरांपैकी एक अल्माटी सोडल्यास भारतातून थेट विमान सेवा उपलब्ध नाही हे लक्षात आलं. त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी लागणारा अधिकचा वेळ तसंच करावा लागणारा ‘द्राविडी प्राणायाम’ हाही न दुर्लक्षिता येणारा घटक तयार झाला. 

आमच्याकडे चार-पाच दिवसंच उपलब्ध होते. मी आणि वास्तुविशारद असलेली माझी मुलगी असे दोघेच जाण्याच्या विचारात होतो. तिला तिथल्या वेगळ्या धाटणीच्या इमारती पाहण्यात विशेष रस होता आणि आम्हाला दोघांनाही मध्य आशियायी वेगळेपण अनुभवायचं होतं. अल्माटी आणि अस्ताना दोन्ही आमच्यापाशी उपलब्ध असलेल्या दिवसांत बसण्यासारखं नव्हतं. त्यानंतर आमचा पर्यटन संशोधन काटा उझबेकिस्तान ह्या देशाच्या दिशेने सरकला. त्यातल्या शहरांची पर्यटनासाठीच्या अनुकूलतेबद्दल चाचपणी केली. उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद. आधी म्हटल्याप्रमाणे ते एक नावाने तरी ओळखीचं शहर होतं. मग ताश्कंदबद्दलचा गूगल शोध सुरू केला. ताश्कंद हे तसं खूप जुनं शहर पण इ.स. १९६६ साली तिथे झालेल्या भयंकर भूकंपात मोठा विध्वंस झाला आणि शहरातील बऱ्याच इमारतींची पडझड झाली. त्याकाळी ताश्कंदच नाहीतर आत्ताचा उझबेकिस्तानचा प्रदेश सोव्हिएत युनियनच्या अधिपत्याखाली होता. भूकंपानंतर ताश्कंदची नव्याने उभारणी सुरू झाली आणि वास्तुशास्त्रीयदृष्टया वेगळ्या धाटणीच्या बऱ्याच इमारती बांधल्या गेल्या. ताश्कंदला एकंदरच नवीन रुपडं चढवलं गेलं. रुंद रस्ते, बाजूला पदपथ, सायकलींसाठी वेगळ्या मार्गिका, बरीच उद्यानं, नंतरच्या काळात भुयारी रेल्वे अशा विविध सुधारणांमुळे ताश्कंद शहर युरोपीय शहरांसारखं आधुनिक शहर बनलं. भूकंपातून वाचलेल्या ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी आणि संवर्धन सुरू झालं. त्यानंतर इ.स. १९९१ साली उझबेकिस्तान अस्तित्वात आल्यावर निर्माण झालेल्या राष्ट्रभावनेतून काही वेगळ्या वास्तू व शिल्पं तयार झाली. ही सर्व माहिती समजल्यावर लक्षात आलं की ताश्कंदमध्ये वास्तुशास्त्रीयदृष्टया तीन-चार प्रकारच्या इमारती वा वास्तू पाहायला मिळू शकतात. अगदी प्राचीन ऐतिहासिक वास्तू ज्यांचं संवर्धन केलं जात आहे अशा वास्तुशास्त्रीयदृष्ट्या महत्वाच्या वास्तू, दुसऱ्या प्रकारच्या वास्तू म्हणजे भूकंपातून वाचलेल्या इ.स. १९६६ पूर्वीच्या थोडया अर्वाचीन वास्तू, तिसऱ्या प्रकारच्या वास्तू ह्या सोव्हिएत कालखंडात इ.स. १९६६ नंतर नव्याने उभारलेल्या आणि चौथ्या प्रकारच्या वास्तू व शिल्पं ज्यांची निर्मिती इ.स.१९९१ नंतर उझबेकिस्तान अस्तित्वात आल्यानंतरच्या काळात झालेली. 

ताश्कंदच्या बरोबरीने पाहता येण्याजोग्या उझबेकिस्तान मधील इतरही महत्त्वाच्या ठिकाणांचा आढावा घेतला. त्यात ताश्कंद नजीकचं शहर म्हणून समरकंद दिसत होतं. समरकंद हे खरंतर एका प्रांताचं नाव असल्याची माझी समजूत होती. समरकंद ऐतिहासिक महत्वाचं ठिकाण असल्याबद्दल माहिती होती पण त्याबद्दल अधिकची माहिती नव्हती. तरी त्याचंही आकर्षण वाटत होतं. मग त्याचाही गुगल शोध घेतला तेव्हा समरकंद हे ऐतिहासिक ‘सिल्क रुट’वरचं महत्वाचं केंद्र होतं आणि त्याकाळातील बऱ्याच वास्तू तिथे अस्तित्वात असल्याचं समजलं. नंतरचा मुद्दा होता तो म्हणजे ताश्कंद ते समरकंद अंतराबद्दलचा आणि त्यांच्यातील वाहतूक व्यवस्थेबद्दलचा. त्याचीही माहिती घेतली. तेव्हा त्यांच्यात रेल्वेमार्गे साधारण दोन-अडीच तासांचं तर रस्तामार्गे थोडं अधिकचं अंतर असल्याचं लक्षात आलं. त्यांच्यात वेगवान ‘बुलेट ट्रेन’ने प्रवासी वाहतूक होत असल्याचं समजलं. ताश्कंदहून एका दिवसात समरकंद पाहून रात्रीला ताश्कंदला परतणं शक्य असल्याचं आणि तशा एक दिवसीय ‘टूर’ उपलब्ध असल्याचं देखील दिसत होतं.  

हळूहळू उझबेकिस्तान नक्की होऊ लागलं. त्याच्या व्हिसाची माहिती घेण्यासाठी उझबेकिस्तानच्या अधिकृत संकेतस्थळावरची माहिती वाचली. भारतीय पासपोर्ट धारकांना त्या देशात जाण्यासाठी इ-व्हिसा मिळतो असं समजल्यावर, तो मिळण्यासाठी लागणारे दिवस, व्हिसाची मुदत आणि त्याचं शुल्क, तसंच त्यासाठी लागणारी कागदपत्रं इत्यादी माहिती वाचली. इ-व्हिसा साधारण तीन ते पाच दिवसांत मिळतो आणि त्यासाठी पासपोर्ट, ठराविक आकारातील फोटो आणि इ-व्हिसा शुल्क  ह्यांचीच आवश्यकता असल्याचं समजलं. आम्हाला २७ ते ३१ ऑगस्ट ह्या कालावधीतच आमचा प्रवासी कार्यक्रम ठरवायचा होता. माझ्या मुलीला त्या दिवसांत तिच्या ऑफिसला गणपती उत्सवाची सुट्टी होती. आमच्या घरी गणपती येत नसल्याने ते शक्य होतं. त्यादिवसांतील उझबेकिस्तानमधील; मुख्यतः ताश्कंद व समरकंदमधील हवामानाबद्दल माहिती देणाऱ्या संकेतस्थळांवर दिलेली माहिती वाचली. त्या दिवसांत तेथील तापमान जास्त असलं तरी ते आम्हाला झेपण्यासारखं असल्याचं लक्षात आलं.

त्यानंतरचा लक्षात घेण्यासाठी आवश्यक मुद्दा होता तो म्हणजे उझबेकिस्तानमधील पर्यटकांच्या सुरक्षेचा. लेखाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे आम्ही ‘तैमुरलंग’च्या देशात जाण्याचा विचार करत होतो. त्याच्या आक्रमणाच्या वेळी भारतात झालेल्या नरसंहाराच्या हकीकती वाचनात आल्या होत्या. जरी काही शतकं लोटली असली तरी जेव्हा तैमुरलंगला उझबेकिस्तानमध्ये ‘राष्ट्रीय नायक’ किंवा ‘राष्ट्र वीरा’चा दर्जा असल्याचं आमच्या वाचनात आलं, तेव्हा नाही म्हटलं तरी मन थोडं कचरलं. पण मधल्या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं असावं आणि उझबेकिस्तान हा पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याचं बऱ्याचशा संकेतस्थळांवर वाचनात आलं. भारत आणि उझबेकिस्तानमध्ये आता चांगले संबंध असून, दोन्ही देश धोरणात्मक भागीदार आहेत; अशी अधिकची माहितीही वाचली आणि आमच्या उझबेकिस्तान भेटीसाठी अजून एक पाऊल पुढे सरकलं.

पुढचा मुद्दा ज्याचा सर्वात शेवटी विचार केला; पण उझबेकिस्तान भेटीला मूर्तस्वरूप देणारा म्हणजे तिथल्या पर्यटनासाठी येऊ शकणारा अंदाजे खर्च. उझबेकिस्तानचं चलन, त्याचा भारतीय रुपयाशी असलेला विनियोग दर, तिथली महागाई इत्यादी. त्यादृष्टीने जरी टूर खर्च उझबेकी चलनात म्हणजे ‘सोम’मध्ये प्रचंड मोठा वाटला तरी भारतीय चलनात, रुपयात तो खिशाला झेपण्यासारखा वाटला. 

आम्ही पूर्णतः शाकाहारी असल्याने, शाकाहारी जेवणाखाण्याची सोय उझबेकिस्तानात उपलब्ध होईल की नाही ह्याबद्दल मनात थोडी शंका होती. अर्थात फक्त त्यासाठीच टूर रद्द करण्याची आवश्यकता नव्हती. मेथी ठेपले, गूळपोळी व इतर टिकणारे शाकाहारी खाद्यपदार्थ सोबत ठेऊन, आम्ही आधीही काही टूर केलेल्या असल्याने, हा मुद्दा आमच्या पर्यटनाच्या आड येणार नव्हता. तरी देखील मुख्यतः ताश्कंदमधील भारतीय रेस्टॉरंट्स संदर्भात चाचपणी केली तेव्हा तिथे चार भारतीय खाद्यपदार्थ मिळणारी रेस्टॉरंट्स असल्याचं समजलं. त्यातल्या एकाचं नाव चक्क ‘राज कपूर इंडियन रेस्टॉरंट’ असं दिसलं. खाण्याच्या बाबतीत आम्ही फार चोखंदळ नाही आणि प्रवासात तर नाहीच नाही. पण ही माहिती वाचून तिथे शाकाहारी भारतीय जेवण मिळू शकत असल्याची खात्री झाली. त्या आघाडीवरही आम्ही निश्चिन्त झालो आणि आमच्या मध्य आशियायी ‘टूर’साठी उझबेकिस्तान हा देश आणि त्यातील ताश्कंद, समरकंद ही शहरं निश्चित झाली.

(नकाशा सौजन्य - गूगल)

क्रमशः ….

© डॉ. मिलिंद न. जोशी

Comments

Popular posts from this blog

उझबेकिस्तानातील; ताश्कंदकडे आणि ताश्कंदमध्ये