उझबेकिस्तानात; एका मध्य आशियायी देशात - भाग २ - पूर्वतयारी
उझबेकिस्तानात; एका मध्य आशियायी देशात
भाग २ - पूर्वतयारी
उझबेकिस्तानला जाण्याचं ठरवलं असलं आणि त्या ‘टूर’साठीचे आमच्याकडील उपलब्ध दिवस म्हणजे २७ ते ३१ ऑगस्ट हेदेखील नक्की झाले असले तरी त्यादृष्टीने ऑगस्टच्या सुरुवातीला आमची सर्वच तयारी व्हायची बाकी होती. मुख्य म्हणजे इ-व्हिसा मिळाल्यावरच इतर तयारी करता येणार होती. उझबेकिस्तानच्या अधिकृत संकेतस्थळावरची इ-व्हिसाच्या संदर्भातील माहिती परत एकदा वाचली. त्यासाठी लागणाऱ्या डिजिटल स्वरूपातील आमच्या छायाचित्रांची निवड केली. पण बराच प्रयत्न करूनही ती छायाचित्रं इ-व्हिसासाठी ‘अपलोड’ होईनात. तेव्हा ‘नाही होत फोटो ‘अपलोड’, आता हा नाद सोड सोड’ ह्या निष्कर्षाप्रत आलो आणि जर उझबेकिस्तानला नियोजित दिवसांत जाऊन यायचं असेल तर लगेचच इ-व्हिसा पुरतं तरी कुठल्यातरी पर्यटन कंपनीचं साहाय्य घेणं आवश्यक असल्याचं लक्षात आलं. मधल्या काळात उझबेकिस्तानातील मुख्यत्वे ताश्कंद आणि समरकंद मधील पर्यटनासंबंधीची माहिती आणि तिथल्या सहली आयोजित करणाऱ्या पर्यटन कंपन्यांची ‘टूर पॅकेजेस’ नजरेखालून घातली. जाऊन-येऊन पाच दिवसांच्या आम्ही ठरवत असलेल्या टूर साठीचे दर थोडयाफार फरकाने सारखेच दिसत होते. त्या कंपन्यांशी फोन संपर्क तसा निष्फळच ठरला. नुसतेच ‘धोधो’ मेसेज येऊ लागले. मग त्यांपैकी जवळच कार्यालय असलेल्या एका टूर कंपनीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याचं ठरवलं.
आम्ही त्या पर्यटन कंपनीच्या कार्यालयात आम्हाला अभिप्रेत असलेल्या टूर संदर्भात सर्व माहिती दिली. तसंच त्यांच्या साईटवर दिसत असलेल्या पाच दिवसांच्या उझबेकिस्तान टूरमध्ये आम्हाला हवे असलेले बदल देखील सूचित केले. त्यांच्या साईटवरच्या टूरमध्ये त्यांच्याकडून टूरचं आरक्षण केल्यास व्हिसा मोफत मिळवून दिला जाणार असल्याचं दर्शवलं होतं. तिथे असलेल्या कर्मचारी वर्गाने आम्हाला अपेक्षित असलेले बदल करून देण्यास मान्यता दिली. तसंच ताश्कंदमध्ये राहण्यासाठी सोयीचं हॉटेल देखील सुचवलं. त्यांच्या साईटवर दर्शवलेल्या हॉटेलपेक्षा आमच्या गुगल शोधनात आम्हाला साधारण तेव्हढ्यात दरात, तेथील स्थळदर्शनाच्या दृष्टीने तसंच शहराच्या मध्यवर्ती भागातील जास्ती सोयीचं हॉटेल लक्षात आलं होतं. तो बदलही त्यांनी करून दिला. एकंदरीत त्यांचं सुधारित टूर पॅकेज बरं वाटत होतं. मुख्य म्हणजे आम्ही त्यासंबंधी आधी काढलेल्या माहितीनुसार होतं. आमच्या वैयक्तिक प्रवासासाठीच्या काढलेल्या अंदाजे खर्चात आणि पर्यटन कंपनीतर्फे दिलं गेलेलं खर्चाचं अंदाजपत्रक ह्यात खूप जास्त फरक नव्हता. जाता-येतानाचं विमानाचं आरक्षण, हॉटेल वास्तव्य ह्यांचे दर तेव्हढेच होते. ताश्कंदला उतरल्यापासून ते परत ताश्कंद विमानतळावर सोडेपर्यंत तसंच मधल्या स्थळदर्शनादरम्यान इंग्रजी बोलू शकणारा ‘टॅक्सी चालक कम मार्गदर्शक’ टूर दरम्यान आमच्या बरोबर असणार होता. ताश्कंद ते समरकंद आणि परतीची बुलेट ट्रेनची तिकिटंही आम्हाला हातात मिळणार होती. त्याशिवाय एक दिवसाची ताश्कंदहून चिमगन माऊंटन आणि चार्वाक लेकची टूर त्यात समाविष्ट होती. आवश्यक तेथील प्रवेश तिकिटं, केबल कार तिकिटंही दिली जाणार होती. ह्यामुळे प्रवासखर्चात थोडीफार वाढ होणार असली तरी बाकीच्या सुविधा मिळणार होत्या. मुख्य म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे वेगळ्या देशात, म्हणजे आमच्या माहितीत तरी तिथे कोणीही न गेलेल्या देशात आम्ही जाणार असल्याने, अधिक विचार न करता व्हिसासाठीची त्यांना हवी असलेली कागदपत्रं तसंच आमची छायाचित्रं दिली आणि पैसे भरून टूर नक्की केली. दुसऱ्याच दिवशी त्या कार्यालयातून फोन आला. आम्ही दिलेली छायाचित्रं उझबेकिस्तान व्हिसाच्या साईटवर ‘अपलोड’ होत नव्हती. म्हणजे आम्हाला आलेला अनुभव त्यांनाही आला. त्यांनी त्या छायाचित्रांच्या ‘सॉफ्ट’ प्रती पाठवायला सांगितल्या. पण त्यातून एक नवीन ‘शिक्षण’ झालं. बऱ्याचदा फोटो स्टुडिओ मधून आपण छायाचित्रांच्या फक्त छापील ‘प्रिंट्स’ घेतो पण फोटो स्टुडिओकडे छायाचित्रांच्या ‘सॉफ्ट’ प्रती असतात आणि त्या आपण मागितल्यावरच आपल्या ईमेलवर पाठवल्या जातात. तशा ‘सॉफ्ट’ प्रती फोटो स्टुडिओकडून मिळवल्या आणि त्या टूर कंपनीला पाठवल्या. तरीही मनात इ-व्हिसाबद्दल शंकेची पाल चुकचुकली कारण आम्ही पैसे भरून बसलो होतो; पण पर्यटन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं.
त्या ‘सॉफ्ट’ प्रतींनी आम्हाला ‘हार्ड’ वाटत असलेलं इ-व्हिसाचं काम सोपं केलं. पाच-सहा दिवसांनी पर्यटन कंपनीकडून अचानक ईमेलद्वारे इ-व्हिसा पाठवला गेला आणि आमच्या उझबेकिस्तान वारीवर शिक्कामोर्तब झालं. त्याबरोबरच त्यांच्याकडून आमचा संपूर्ण प्रवास कार्यक्रमही मिळाला. आम्ही नेहेमी स्वतंत्र फिरणारे. ह्या आधी एकदाच आम्ही प्रवासी कंपनीबरोबर अंदमान टूर केली होती. ह्यावेळी व्हिसाच्या संबंधित मदतीसाठी पर्यटन कंपनीची मदत घेण्याच्या निमित्ताने तिथे गेलो होतो आणि आम्हाला आमचे प्रवासी ‘कष्ट’ कमी करणारं, अपेक्षित असं ‘कस्टमाईज्ड’ टूर पॅकेज मिळालं. तसंच पहिल्या दिवशी संध्याकाळी आणि इतर दिवशी दिवसभराच्या स्थळदर्शनाच्या नंतर आम्हाला स्वतंत्रपणे फिरता येणार होतं. आमच्यासारख्या स्वतंत्रपणे फिरणाऱ्यांना तेव्हढं तरी स्वातंत्र्य हवं होतं.
उझबेकिस्तानचा इ-व्हिसा मिळाल्यावर त्यावरचं नाव, पासपोर्ट क्रमांक, त्याची वैधता आणि इतर संबंधित मजकूर बरोबर असल्याची खात्री केली. इ-व्हिसावरची माहिती ‘उझबेकी’ आणि इंग्रजी अशा दोन भाषांत दिली होती. उझबेकी भाषेसाठी रोमन लिपीच वापरली होती. त्यामुळे वाचता येत होती. त्यातील काही शब्द मराठी, हिंदी शब्दांशी अर्थाने मिळतेजुळते दिसत असल्याने वाचताना गंमत वाटत होती. तसे शब्द वेगळे नोंदवून ठेवले आणि पुढे उझबेकिस्तान प्रवासात त्यांत भर पडत गेली. उदाहरणार्थ; मक्सद म्हणजे उद्देश, मुद्दती म्हणजे कालावधी, शहर म्हणजे शहर, कितोब म्हणजे किताब (पुस्तक) इत्यादी.
इ-व्हिसा मिळाल्यावर आमच्या तयारीला खरी गती आली. मधल्या काळात ताश्कंदमधील स्थळदर्शन यादीतील एकेका ठिकाणाची गुगलवरून माहिती वाचणं, त्यात दिलेली त्याची ठळक वैशिष्ट्यं, त्या स्थळाचं आमच्या हॉटेलपासूनचं अंतर वगैरे माहिती मोबाईल फोनच्या नोट्समध्ये नोंदवायला सुरुवात केली. हल्ली मी ही अशी माहिती ‘हँडी’ ठेवतो कारण प्रत्येक ठिकाणी चांगला मार्गदर्शक मिळतोच असं नाही तसंच काही ठिकाणी मार्गदर्शकाची तशी गरजही नसते. तेव्हा ही अशी हाताशी असलेली माहिती आयत्यावेळी उपयोगी पडते. तशीच समरकंद स्थळदर्शनाच्या संबंधित माहिती मोबाईल फोनमध्ये दडवली. चिमगन माऊंटन आणि चार्वाक लेक संबंधी माहिती नुसती वाचली. त्यातल्या ‘चार्वाक लेक’ ह्या नावातील ‘चार्वाक’ ह्या नावाने उत्सुकता चाळवली कारण ते नाव भारतीय पद्धतीचं वाटलं. चार्वाक ऋषींबद्दल पूर्वी कधीतरी वाचलं होतं. परत एकदा गुगल कवाड उघडलं. चार्वाक ऋषी, चार्वाक तत्वज्ञान वगैरे माहितीचं बरंच ‘चर्वितचर्वण’ त्यात सापडलं. त्यातील झेपेल इतपत माहिती वाचली आणि त्याचा साठव मोबाईल फोन ऐवजी मेंदूच्या कप्प्यातच केला. ‘चिमगन माऊंटन’ हा शब्द माझ्या तोंडात ‘चिंगम माऊंटन’ असा ‘च्युईंग गम’सारखा का चिकटला, ते माहीत नाही. पण घरात बोलतानाच नव्हे तर पर्यटन कंपनीच्या कार्यालयात देखील ‘चिंगम’ असाच उच्चार मी करत होतो आणि तो सुधारण्याची जबाबदारी सोबतचे किंवा आजूबाजूचे पार पाडत होते. असो. स्थळदर्शनाच्या संबंधीची प्राथमिक माहिती घेऊन झाल्यावर आम्ही जात असलेल्या कालावधीतील तिथल्या हवामानाविषयी माहिती काढली. खरंतर सप्टेंबर पासून नोव्हेंबर पर्यंत तेथील हवामान जास्त चांगलं असल्याचं लक्षात येत होतं. पण आम्ही ऑगस्टच्या शेवटाला तिथे जाणार असल्याने तिथे उन्हाळा जरी असला तरी तो साधारणतः आपल्या इथल्या उन्हाळ्यासारखा असल्याचं तापमानावरून दिसत होतं. त्यामुळे थंडीच्या कपड्यांची गरज नव्हती. विमानतळावर किंवा लागल्यास फ्लाईटमध्ये घालण्यासाठी एक लाईट जॅकेट आणि बाकी नेहेमीचे कपडे अशा निष्कर्षाला पोहोचत असताना, तिथल्या मशिदी आणि मदरशांमध्ये शरीर पूर्ण झाकणारे कपडे आवश्यक नव्हे पण श्रेयस्कर असल्याचं सूचित केलेलं दिसलं. त्यामुळे ज्या दिवशी मशीद, मदरशांची भेट होती त्या दिवसांसाठी पूर्ण बाह्यांचे शर्ट किंवा कुडते बरोबर घ्यायचे ठरवले. पूर्ण जीन्स पँट, ट्राउझर्स त्यांच्या नियमांत आडकाठी आणत नव्हत्या. तसंही मी कधीच एक चतुर्थांश, दोन चतुर्थांश, तीन चतुर्थांश आकाराच्या ‘शॉर्टस’, अर्ध्या चड्ड्या, बर्म्युडा वगैरे घालून बाहेर हिंडत नसल्याने ती बाजू तशी कायम झाकलेलीच असते; त्यामुळे त्यांचा नियमभंग होण्याचं भय नव्हतं.
आमच्यासाठी नंतरचा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे खाण्यापिण्याच्या संदर्भातला. ‘खाणेपिणे’ हा जोडशब्द असल्याने आणि तशी बोलण्याची पद्धत असल्याने तसा वापरला. ‘सॉफ्ट’ म्हणता येतील अशाच पेयांचं प्राशन करत असल्याने आमच्यासाठी ‘पिणे’ हा त्यातला भाग तसा गैरलागूच. आम्ही पूर्णतः शाकाहारी असल्याने ज्या ठिकाणी जायचं तिथल्या, मुख्यत्वेकरून भारताबाहेर जाताना तिथल्या शाकाहारी पदार्थांच्या उपलब्धतेविषयी माहिती घेतो. तशी शक्यता कमी असल्यास सोबत टिकणारे खाद्यपदार्थ ठेवतो. आमच्या एअर अरेबियाच्या चारही फ्लाईट्समध्ये ‘इंडियन व्हेज’ पर्याय उपलब्ध होता. त्यामुळे विमानप्रवासासाठी वेगळे तहानलाडू-भूकलाडू सोबत ठेवण्याची आवश्यकता नव्हती पण ताश्कंदला पोहोचल्यावर तीन-चार दिवसांसाठी भारतीय खाद्यपदार्थ मिळण्याची शक्यता अजमावण्यासाठी परत गुगल शोध सुरू केला. परदेशांत बऱ्याच शहरांमध्ये आता भारतीय उपहारगृहं आहेत. ताश्कंदमध्ये तीन भारतीय खाद्यपदार्थ मिळणारी उपहारगृहं असल्याचं समजलं. त्यातलं एक तर आम्ही राहणार असलेल्या हॉटेलच्याच इमारतीत असल्याचं लक्षात आलं. त्याचं नावदेखील भारतीय म्हणजे ‘राज कपूर रेस्टॉरंट’ असं होतं. त्याच्या ‘मेन्यू कार्ड’चा फोटोदेखील पाहायला मिळाला. दाक्षिणात्य तसंच उत्तर भारतीय ‘व्हेज’ तसंच ‘नॉनव्हेज’ पदार्थ तिथे उपलब्ध होते. आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ मिळणाऱ्या उपहारगृहात न जाण्याइतके ‘सोवळे’ नाही. थोडक्यात ज्यांना ‘नॉनव्हेज’ नको असेल त्यांना ‘नान आणि व्हेज’ नक्की उपलब्ध होणार होतं. हॉटेलमध्ये ‘कॉम्प्लिमेंटरी’ ‘ब्रेकफास्ट’ होता. त्यात ‘कॉंटिनेंटल’ प्रकारचे काही शाकाहारी पदार्थ असण्याची शक्यता होती. आमच्यासाठी ‘जावे त्यांच्या देशा, पाहावे त्यांच्या देशा’ घडत असलं तरी ‘खावे त्यांच्या देशीचे’ मात्र क्वचितच घडतं. ताश्कंद ते समरकंद जाता-येतानाच्या बुलेट ट्रेन प्रवासात देखील ‘व्हेज’ पर्याय होता. अर्थातच तो निवडला. अशा रीतीने इतर तयारीच्या बरोबरीने अन्नब्रम्हाची बरीचशी तजवीज परस्पर झाल्याने सोबतचं सामानही ह्यावेळी तसं हलकं झालं.
आधी म्हटल्याप्रमाणे मुंबईहून ताश्कंदला थेट विमानसेवा नाही. आमचं एअर अरेबिया विमान कंपनीचं तिकीट होतं. आमचा मुंबईहून शारजाह, पुढे शारजाह ते ताश्कंद आणि त्याच मार्गे परतीचा प्रवास होणार होता. मध्य आशियासारख्या वेगळ्या मुलखातील उझबेकिस्तानला जाण्यासाठी शारजाहच्या विमानात शिरलो; नव्या उमेदीने, एक वेगळा अनुभव घेण्यासाठी.
क्रमशः ….
© डॉ. मिलिंद न. जोशी
Comments
Post a Comment