उझबेकिस्तानात; भाग ४ - ताश्कंद ते समरकंद
उझबेकिस्तानात; भाग ४ - ताश्कंद ते समरकंद
उझबेकिस्तानातला ‘समर’ अजून पूर्णतः संपला नव्हता. आधीच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे माझं समरकंद बद्दल वेगळंच मत तयार झालं होतं. ते शहर वाटण्याऐवजी माझा समज समरकंद हे एखाद्या प्रांताचं नाव असावं, असा झाला होता. अर्थात ह्या समजाला कोणताही आधार नव्हता. उगीचच एक तयार झालेलं मत. भारतातून आणि चीनमधून निघणारे ऐतिहासिक ‘सिल्क रूट’ किंवा ‘रेशीम मार्ग’ समरकंदमध्ये एकत्र येत; ही माहिती वाचनात आली होती. खरंतर तेही एक कारण आमच्या मध्य आशियातील उझबेकिस्तान हा देश निवडण्यामागे होतं. त्यामुळे उझबेकिस्तान प्रवासात नुसतं ताश्कंद न पाहता, समरकंद देखील त्यात समाविष्ट केलं गेलं. ताश्कंदहून एका दिवसात समरकंद पाहून परत ताश्कंदला येणं शक्य असल्याचं गुगल शोधनात लक्षात आलं. ताश्कंद आणि समरकंद दरम्यान रस्तामार्ग आणि रेल्वेमार्ग असे दोन पर्याय होते. पैकी रेल्वेमार्गाने जलद आणि सुखकर प्रवासासाठी बुलेट ट्रेन उपलब्ध होती.
आदल्या दिवशी ताश्कंदला पोहोचल्यावर आम्हाला आमच्या हॉटेलला सोडताना आमच्या तिथल्या ‘कार चालक कम गाईड’ने ताश्कंद ते समरकंद आणि परतीची बुलेट ट्रेनची तिकिटं दिली होती. ती तिकिटं सांभाळून ठेवण्याबद्दल तसंच त्यांच्याबरोबर पासपोर्ट, व्हिसादेखील सोबत बाळगणं आवश्यक असल्याचं त्याने सांगितलं होतं. ते सर्व सोबत घेतल्याची खात्री केली. थोडे खाद्यपदार्थ जवळ बाळगले आणि साडेसातला हॉटेलच्या स्वागतकक्षात पोहोचलो. आमचे ‘व्हेज’ ब्रेकफास्ट पॅक तिथे तयार होते; तेही बरोबर घेतले. आदल्या दिवशी रात्री आम्ही हॉटेलला तशी पूर्वकल्पना दिली होती आणि ‘व्हेज’ संबंधीची आमची संकल्पनाही समजावून सांगितली होती. हॉटेल लॉबीत बसणार तेव्हढ्यात आमच्या कार चालकाचा, जसुरचा तो ‘पार्किंग’मध्ये आमची वाट पाहत असल्याचा फोन आला. आदल्या दिवशीपासून मी त्याला ‘जसुर’च्याऐवजी ‘असुर’ ते ‘मसूर’ अशा वेगवेगळ्या नावांनी आमच्यात संबोधत होतो. शेवटी ‘जसुर’ नावाशी ‘सूर’ जुळले. पुढले दोन-तीन दिवस त्याला त्याच्या ‘त्या’ नावाने हाक मारायला लागणार होती. आम्ही बुलेट ट्रेनची तिकिटं आणि इतर कागदपत्रं जवळ बाळगल्याची त्याने खात्री केली आणि दहाव्या मिनिटाला आम्हाला ताश्कंद रेल्वे स्टेशनवर सोडलं. आम्ही तिथे खूपच लवकर पोहोचलो होतो. रात्री समरकंदहून परतल्यावर स्टेशनच्या दुसऱ्या बाजूस तो आमच्यासाठी थांबणार असल्याचं त्याने सांगितलं. ज्याठिकाणी तो थांबणार होता, तिथे पोहोचण्यासंबंधीचं त्याने शब्दशः विस्तृत ‘मार्ग’दर्शन केलं. स्टेशनची ‘दुसरी बाजू’ आम्ही बघितली नसल्याने त्यातलं बरचसं डोक्यावरून गेलं. तरी ते सर्व समजल्यासारखं डोकं हलवलं आणि ‘ते’ तेव्हाचं तेव्हा बघू, ह्या निष्कर्षाप्रत आलो. आत शिरण्याआधी स्टेशन बाहेरून पाहून घेतलं. हवा आल्हाददायक होती. स्टेशन समोरच्या बागेत थोडा फेरफटका मारला. आत शिरताना विमानतळावर होतं तसं आमच्या सॅक्सचं ‘मशीन स्क्रिनिंग’ झालं. आमची आणि आमच्या तिकिटांची तपासणी झाली. ट्रेनच्या सुटण्याच्या वेळेच्या आधी अर्धा की पाऊण तासापर्यंतच प्रवाशांना स्टेशनमध्ये प्रवेश दिला जात असल्याने, जसुरने आम्हाला एक तास आधीच स्टेशनवर सोडलं होतं. स्टेशनवरच्या एका रिकाम्या बाकावर बसलो. प्लॅटफॉर्मवर एक बुलेट ट्रेन उभी होती. ती आधीची ट्रेन असल्याची खात्री केली आणि आमचे ब्रेकफास्ट पॅक उघडले. सावकाशपणे खात ते संपवले. तेव्हढ्यात ती ट्रेन सुटली आणि आमच्या ट्रेनसाठीचा कर्मचारी वर्ग स्टेशनवर हजर झाला. पाठोपाठ ‘पॅन्ट्री’साठीचं सामान आलं. हळूहळू प्लॅटफॉर्म गजबजू लागला. हे सर्व पाहत आमचा वेळ मजेत जात होता. ट्रेन आल्यावर, पळापळ टाळण्यासाठी आमच्या ‘कोच’च्या अपेक्षित जागेची स्थाननिश्चिती करण्याचा प्रयत्न केला. स्टेशनवरच्या उद्घोषणा उझबेकी आणि रशियन भाषेत होत होत्या. त्यातून होणारा अनर्थबोध दूर करण्यासाठी तिथल्या एका कर्मचाऱ्याला आमची तिकिटं दाखवली. त्याने ‘उझबेकी’ की ‘रशियन’ भाषेत आम्हाला समजावलं आणि त्यावेळी त्याने केलेल्या अंगुलीनिर्देशानुसार एका ठिकाणी थांबलो. तेव्हढ्यात ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊ लागली. ट्रेन थांबली तरी आमच्या कोचचा क्रमांक दृष्टीस पडला नाही. समोरच असलेल्या दुसऱ्या एका गणवेषधारी स्त्री कर्मचाऱ्याला आमची तिकिटं दाखवली. तिने आधीच्या विरुद्ध दिशेला हात केला. आम्ही त्या दिशेला पळालो आणि शेवटी आम्ही सुरुवातीला उभे असलेल्या जागीच परत पोहोचलो. कोचमध्ये शिरताना तिकिटांची तपासणी झाली. आम्ही आत शिरलो. आतील व्यवस्था आणि सोयी चांगल्या होत्या. ताश्कंद ते समरकंद दरम्यान ट्रेन एकाच स्टेशनवर थांबली. मध्ये एकदा ‘व्हेज’ नाश्ता आला. त्याच्या ‘पॅक’वर ‘व्हेज’ दर्शवणारा हिरवा ठिपका होता तरी देखील तो ‘व्हेज’ असण्याबद्दल ‘कोच सुंदरी’कडे
विचारणा केली. देशोदेशींच्या ‘व्हेज’ खाण्याच्या संबंधीच्या संकल्पनांचे अनुभव गाठीशी होते. तिने ‘उझबेकी’ की ‘रशियन’ भाषेत उत्तर दिलं आणि घोळ थोडा वाढला. शेवटी तिला ‘नो मीट?’ असं प्रश्नार्थक विचारल्यावर तो खडा बरोबर लागला. तिनेही ‘नो मीSSSSट’ असं ‘मीट’ मधल्या ’मी’चा अतिदीर्घ उच्चार करत उत्तर दिलं. ‘नो मीट; यू कॅन अगदी ‘मिटक्या’ मारत इट’, इतका मोठा अर्थ त्यात सामावलेला असल्याचं भासलं. नाश्ता ‘व्हेज’च असण्यासंबंधीचा प्रश्नच ‘मिट’ला आणि ती ‘मीट’ संपली. सोबत चहा दिला गेला. समरकंद जवळ आलं आणि खिडकीबाहेर दिसणारा ‘नजारा’ बदलू लागला. जास्ती ओसाड प्रदेश, ‘रेगीस्तान’,मधेच लहान टेकड्या दिसू लागल्या. हे असं अवलोकन ट्रेन प्रवासात शक्य असतं. त्यामुळे मोठी ‘ज्ञानवृद्धी’ वगैरे होत नसली तरी ते आनंददायी असतं. अर्थात हे ज्याच्या-त्याच्या आवडीवर अवलंबून असतं. ट्रेनमधले आमच्या आजूबाजूचे काही निद्रादेवीचा आशीर्वादप्राप्त प्रवासी त्यांच्या आवडीनुसार बसल्या जागी केव्हाच स्वप्नात हरवले होते. त्यांच्या घोरण्याचा आवाज त्यांच्या ‘जिते’पणाची जाणीव देत होता. इतर प्रवासी त्यामुळे ‘जागते’ राहत होते. ‘जिते-जागते’ शब्द त्यांतूनच निर्माण झाला असावा अशी एक पुसट शंका मनात आली. घोरण्याच्या आवाजाला भाषेचं बंधन नसावं. देशोदेशी बोली भाषा बदलली तरी झोपेच्या ‘गुलामां’ची ‘घोरी’ भाषा ‘तश्शीच’ असते; ही ‘ज्ञानवृद्धी’ मात्र झाली.
समरकंद आलं. स्टेशनवर उतरलो. बाहेर प्रचंड गरम हवा जाणवत होती. सकाळी सव्वादहाच्या उन्हाचे देखील चटके बसत होते. ऊनविरोधी आयुधं धारण केली. डोक्यावर ‘हॅट’ आणि डोळ्यांवर गॉगल चढवले आणि स्टेशनचं अवलोकन केलं. स्टेशनबाहेर पडण्यासाठी ‘बहुजन’ धरत असलेली वाट पकडली. स्टेशनबाहेर आम्हाला समरकंद दर्शन घडवण्यासाठीचा टॅक्सी चालक कम मार्गदर्शक, आमच्या नावाची पाटी हातात धरून उभा असणं अपेक्षित होतं. तसे ‘पाटी’दार इसम दिसत होते पण त्यातल्या कुठल्याच पाटीवर आमचं नाव नव्हतं. ते सोडून इतरही बरेच जण समरकंदच्या प्रेक्षणीय स्थळांची नावं व सोबत त्यांची रंगीत छायाचित्रं असलेल्या पाट्या हातात धरून गिऱ्हाईकं हेरत होते. काही उतारू त्यांच्याशी स्थळदर्शन दरासंदर्भात वाटाघाटी करून त्यांच्या टॅक्सीत बसत होते. आमच्याकडे देखील काही जणांनी विचारणा केली पण आमचं ‘टूर बुकिंग’ झालेलं असल्याने आम्ही नम्र नकार देत होतो. आम्ही थोडं बाजूला सावलीत उभं राहून आमच्या टॅक्सी चालकाची वाट पाहायचं ठरवलं. आम्हाला न्यायला कोणीही आलेलं नसल्याने, आमच्या समरकंद स्थळदर्शन कार्यक्रमासंबंधी आमच्या पर्यटन कंपनीकडून काही घोळ झाला नाही ना; अशी शंका मनात आली. तसंच आपण स्टेशनबाहेर भलतीकडेच थांबलो नाही ना; अशीही शंका येऊ लागली. मग स्टेशन परिसरात टॅक्सी शोधत दोन चकरा मारल्या. शेवटी पर्यटन कंपनीच्या समरकंद मधील एजंटला फोन लावला. आमच्या पाचव्या फोन कॉलला पलीकडून प्रतिसाद मिळाला. आमच्या समस्येबद्दल दुसऱ्या बाजूस पूर्णतः अनभिज्ञता होती. आम्हाला ‘पाचंच मिनिटं’ ‘वेट’ करायला सांगितलं गेलं. पंधरा मिनिटांच्या ‘वेट’ नंतर परत ‘फोनाफोनी’. ह्यावेळी दोन मिनिटांची वेळ मागितली गेली. शेवटी पाऊण तासांच्या ‘वेटिंग’नंतर एक टॅक्सी चालक आणि अजून एक इसम अवतरले. ते आमच्यासाठीच पाठवले गेल्याची एजंटकडून खात्री केली. आमचं फोनचं ‘इंटरनॅशनल रोमिंग’ कामी आलं. त्या सोबतच्या इसमाने टॅक्सी चालकाला आमच्या स्थळदर्शनाची माहिती दिली असावी; म्हणजे त्याने त्याच्या तोडक्या-मोडक्या इंग्रजीतून आम्हाला तसं सांगितलं. आम्ही त्या चालकाच्या सोबत टॅक्सीतून निघालो आणि एक साक्षात्कार झाला की चालकाला इंग्रजीचा गंधही नव्हता. आमच्या पहिल्याच प्रश्नाला त्याने त्याचा मोबाईल फोन आमच्यासमोर धरला आणि आम्हाला त्याच्या फोनमधील इंग्रजी ते रशियन की उझबेकी भाषांतर ‘ट्रान्सलेटर’वर बोलण्याची खूण केली. त्या फोनवर उमटलेल्या भाषांतरित मजकुराचं त्याने परत लेखी उत्तर दिलं. हे असं संभाषण दिवसभर सुरू राहणार होतं. आमच्या ‘लेखी’ त्या चालकाची किंमत बरीच कमी झाली असली तरी तसं ‘तोंडी’ सांगताही येईना. ‘अडला हरी’ अशी आमची अवस्था झाली होती. नाराजी व्यक्त करण्यात अर्थ नव्हता. आधीच बराच वेळ वाया गेला होता. समरकंदमधील निदान महत्त्वाचं स्थलदर्शन तरी घडावं अशी माफक अपेक्षा आम्ही ठेवली. थोडक्यात प्रवासी कंपनीच्या तिथल्या एजंटला आधी ठरवलेल्या टॅक्सी चालकाने ‘टांग मारली’ होती आणि आम्ही फोनवर ‘बोंबाबोंब’ केल्यावर हा टॅक्सी चालक आयत्यावेळी पकडून आणला असल्याचं लक्षात आलं. आमच्या लेखी प्रश्नाचं, लेखी उत्तर मिळेस्तोवर त्याने एका ठिकाणासमोर टॅक्सी थांबवली आणि आम्हाला ते ठिकाण पाहण्यासाठी असलेल्या प्रवेश तिकिटं विकत घेण्यासाठीची तिकिट खिडकी दाखवली. आमच्या प्रवासी कार्यक्रमानुसार आमच्या सर्व प्रवेश तिकिटांचं आरक्षण प्रवासी कंपनीच्या एजंटकडून होणं अपेक्षित होतं. तसं आम्ही सांगितल्यावर म्हणजे परत ‘तोंडी - लेखी’ संभाषण, ‘फोनाफोनी’ झाल्यावर ती तिकिटं हातात पडली आणि ती पाहिल्यावर अजून एक वेगळाच साक्षात्कार झाला. ते ठिकाण आमच्या प्रवासी कार्यक्रमात खरंतर अंतर्भूतच नव्हतं. ‘आमिर तेमुर’चं म्हणजे ‘तैमुरलंग’चं थडगं असलेली ती वास्तू होती आणि हे समरकंद मधलं महत्त्वाचं ठिकाण प्रवासी कंपनीने आमच्या स्थळदर्शनाच्या यादीत समाविष्ट केलं नव्हतं. समरकंद रेल्वे स्टेशनवर उतरल्यापासून बरेच धक्के बसले होते पण हा धक्का थोडा सुखद होता.
© डॉ. मिलिंद न. जोशी
Comments
Post a Comment